वारी - सगुणाकडून निर्गुणाकडे - एक प्रवास

 

वारी म्हटले की  पहिल्यांदा डोळ्यासमोर येते, ते शाळेच्या पुस्तकातले वर्णन - महाराष्ट्रातील संत आणि वारकरी संप्रदाय ( टीप लिहा - ४ मार्क) आणि पाठोपाठ दरवर्षी पेपरमध्ये येणारा दिवेघाटातला  ज्ञानोबा माउलींच्या पालखीचा आणि वावरकऱ्यांच्या अलोट गर्दीचा फोटो. लहानपणी वारीशी संबंध आला, तो एवढाच. ह्यात मधेच एक छोटीशी भर पडली म्हणजे बाबांच्या ऑफिसमधले एक जण वारकरी होते, ते  दरवर्षी वारीला जायचे  आणि प्रसाद घेऊन यायचे.  एका वर्षी त्यांनी  आमच्यासाठी विठोबाची फ्रेम आणली होती. प्रत्यक्ष वारीत जाणारी  मी बघितलेली ती  पहिली व्यक्ती.  मग खूप नंतर वारकऱ्यांचा  विठ्ठल भेटला, तो इरावती कर्व्यांचा “बॉयफ्रेंड” म्हणून, त्यांनी अनुभवलेली वारी वाचताना. 

पुण्यात शिकायला आल्यावर, मी विद्यापीठात म्हणजे आमच्या भाषेत जंगलात राहायची. त्यामुळे कधीतरी स्थानिक मुलामुलींकडून पालख्या येणार, त्यामुळे रस्ते बंद असे ऐकले होते, तेवढेच. त्यांनतर पुण्यात स्थायिक झाले, तरी पेपरमधल्या बातम्या सोडल्यास वारीशी काहीही संबंध नव्हता. पालख्यांचे दर्शन घेणे वगैरे लांबच, त्या दिवसात पेठांमध्ये शक्यतो जायचेच नाही हाच शिरस्ता. मुलगा  शाळेत जायला लागला आणि पुण्यातले पालखी प्रेम आमच्या घरापर्यंत आले. पालख्या येणार त्या दिवशी शाळेला सुट्टी. त्या दरम्यान एकदा तरी  वारकऱ्याचा पोशाख घालून शाळेत पाठवणे, शाळेत दरवर्षी कुठला तरी विषय घेऊन मुलांची एक दिंडी निघायची, त्यासाठी आवश्यक ती तयारी करून घेणे, इतपत वारी आमच्या घरात आली.  त्यानंतर १०-११ वर्षांनी मी COEP त म्हणजे पालख्यांच्या दृष्टीने  मध्यवर्ती ठिकाणी नोकरीनिमित्ताने जायला लागले आणि वारी आणखी जवळ आली. पहिल्या वर्षी कॉलेजच्या non teaching staff  तर्फे कॉलेजच्या चौकात होणाऱ्या वारकऱ्यांच्या  स्वागतासाठी वर्गणी गोळा करण्यापासून  वारीची चर्चा  सुरु झाली आणि पालख्या यायच्या आदल्या दिवशी HOD नी सांगितले की उद्या दुपारी १२ पर्यंत आपापल्या सोयीनुसार घरी जायला लागा, अघोषित सुट्टी. दुसऱ्या दिवशी मी घरी जायला निघाले आणि मला Mechanical Department चा अख्खा  व्हरांडा वारकऱ्यांनी भरून गेलेला दिसला. कोणी लवंडले होते, कोणी एकत्र बसून खात होते, सगळे एकदम निवांत होते, सवयीच्या जागी असल्यासारखे.  आणि मी सोडल्यास आजूबाजूच्या सगळ्यांनाही ते सवयीचे असावे असे वाटत होते.  मग बसमधून डेक्कनवर येईपर्यंत संपूर्ण जंगली महाराज रस्त्यावर वारकरी दिसत होते. तोंडाने “ग्यानबा तुकाराम” चा जप आणि एका लयीत चालणे. पालख्या यायला चार वाजतात तरी घरी जायची घाई का? ह्याचे उत्तर मिळाले. हे वारकरी म्हणजे नोंदणी असलेल्या दिंड्यांशिवायचे हे पुढे काही वर्षांनी सुप्रियाकडून कळले. दुसऱ्या दिवशी संपूर्ण फर्ग्युसन  रोडवर डाव्या बाजूला ट्रकची रांग. हे दिंड्यांचे ट्रक असे कळले. पुढच्या वर्षी मी घरी येताना ठरवून कॉलेज पासून डेक्कन पर्यंत त्या वारकऱ्यांच्या बरोबर चालत आले. एरवी त्या रस्त्याने चालणे आणि असे चालणे ह्यात फरक होता बराच. 

इतकी वर्षे लांबून माहित असलेली वारी २०१५ सालापासून घरातच आली. माझ्या  हैदराबादच्या नणंदेने -  सुप्रियाने  त्या वर्षी आळंदी - पुणे वारीबरोबर  चालायचे ठरवले. हैद्राबादचा एक गट होता त्यांचा. आदल्या दिवशी आळंदीला जाऊन दुसऱ्या दिवशी वारीबरोबर परत असा त्यांचा बेत होता. आळंदीत मंदिरातून पादुकांची पालखी निघायच्या काही क्षण आधी  मंदिराचा कळस हलतो, हा ज्ञानेश्वर माऊलींचे अस्तित्व अजूनही उर्जारूपात आळंदीत असल्याचा आणि आता त्यांनी वारीला सुरुवात करायला परवानगी दिली ह्याचा पुरावा मानला जातो. ( वाद्यांच्या अखंड गजरात निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे हे घडत असेलही कदाचित, पण म्हणून अशाच गजरात दुसऱ्या एखाद्या मंदिराचा हलतो का? किंवा आळंदीतल्याच मंदिराचा, तेवढाच वाद्यांचा गाजर केला कि एरवी कधी पण हलतो का? कि तो एक भास आहे?)  भाविकांच्या श्रद्धेनुसार  तो कळस हलला की पालखी मंदिरातून निघून माउलींच्या आजोळघरी मुक्कामाला येते. सुप्रियाच्या गटातील एकाचे त्यांच्याशीच नाते होते, म्हणून हे लोक तिथेच उतरले होते. त्या दिवशी तिथे पादुकांची पूजा होते. मग सकाळी पालख्या पुण्याकडे निघतात. तिच्यामुळे आमच्या सगळ्यांच्याच ज्ञानात भर पडली. पेपरमध्ये बातमी वाचणे आणि तिचे फोटो बघणे, वारकऱ्यांचे किस्से ऐकणे ह्यात फरकच. 

एक अनुभव म्हणून आळंदी - पुणे एकदा वारीबरोबर चालावे असाच सुप्रियाचा पण विचार होता. पण तसे झाले नाही. हैदराबादमधील कोणत्यातरी कीर्तन कार्यक्रमात तिची एका वादकांच्या गटाशी ओळख झाली, मराठवाड्यातील एका गावाहून निघणारी त्यांची दिंडी होती आणि ते दरवर्षी पूर्ण वारी करायचे. त्यांच्या प्रमुख महाराजांशी तिची ओळख झाली आणि ते तिला त्यांच्या दिंडीबरोबर यायला हो म्हणाले. आणि पुढच्याच वर्षी तिने पुणे- सासवड त्या दिंडीबरोबर चालायचे  ठरवले. आणि तिथून सुरु झालेला हा प्रघात आजतागायत चालू आहे. आता चक्क आमच्या घरात पण जून आला की, पालख्या कधी येत आहेत? सुप्रियाचे रिझर्व्हशन झाले का? कधी येणार? ह्यावेळेस कोणता टप्पा? अश्या  चर्चा सुरु होतात. लांबून माहित असलेल्या देवळाच्या जवळ हळूहळू जावं, आधी कळस दिसावा, मग दारातून आत जावं, असे करत आम्ही ह्या वारीच्या सभामंडपात तर  पोहोचलो आणि सुप्रियाच्या नजरेतून वारी दिसायला लागली हळूहळू. 

पालखीच्या पुढे आणि मागे दिंड्या असतात. पुढच्या दिंड्यांची संख्या ठरलेली आहे, त्या परंपरागत आहेत, त्यात नवीन भर पडत नाही. सुप्रिया ज्या दिंडीतून जाते ती पुढून २२ क्रमांकाची दिंडी. मागे ८००-९०० पण दिंड्या असू शकतात. आणि त्याशिवाय कोणत्याही दिंडीत न नोंदलेले लाखो लोक. प्रत्येक दिंडीत २५०-४०० वारकरी. ती संख्याही फार वाढत नाही. प्रत्येक दिंडीत टाळ वाजवणारी,  इतर वाद्ये  वाजवणारी पथके असतात,  तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालणाऱ्या, पाण्याच्या कळशा घेऊन चालणाऱ्या बायका असतात. प्रत्येक दिंडीबरोबर त्यांचा ट्रक असतो. त्यात घडीचे दोन तंबू, चालणाऱ्या वारकऱ्यांचे सामान, शिधा, गॅस सिलेंडर, स्वयंपाक करणाऱ्या बायका, तंबू ठोकणारे लोक असे सगळे असतात. दिंडीची विसावा घ्यायची, नाश्त्याची, जेवायची ठिकाणे ठरलेली असतात. दरवर्षी विशिष्ट ठिकाणी नाश्ता/ जेवण स्वखर्चाने देणारे लोक असतात.  दिंडीत चालणारे वारकरी एक शिस्त कायम पाळतात ती म्हणजे ते अखंड नामस्मरण किंवा हरिपाठ, भजने म्हणतच चालतात. इतर गप्पा नाहीत. त्या प्रचंड गर्दीत हरवू नये म्हणून कोणीही रांग मोडत नाहीत, मागे पुढे झाले  तर बायका पळत सुटतात, पण एकमेकींचे हात घट्ट धरून असतात.

पालखी मुक्कामाला पोहोचली की संध्याकाळी सात वाजता तिथे आरती होते. तेव्हा दुसऱ्या दिवशीच्या सूचना मिळतात. तेव्हा टाचणी वाजली तरी ऐकू येईल एवढी शांतता असते - एवढे लोक असूनही. मुक्कामाच्या ठिकाणी ज्या  पादुकांच्या दर्शनासाठी स्थानिक लोक गर्दी करतात, त्यांचे दर्शन घेणे खुद्द वारकऱ्यांनाही सोपे नसतेच. संपूर्ण वारीत एकदा कधी तरी ते घेतात. आरती झाली की आपापल्या तंबूत येऊन झोपतात. बायकांचा  आणि पुरुषांचा तंबू वेगवेगळा असतो. खाली अंथरायला काहीही नसते. आपापली वळकटी उघडून झोपायचे. हल्ली तंबूत वीज असते, फोन चार्जिंग वगैरे करता येते. पहाटे २.३०/ ३ ला उठावे लागते. कारण तंबू मोडून, सामानासकट ट्रक वारी सुरु व्हायच्या आधीच पुढच्या मुक्कामी निघतात. मागाहून येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांची नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची  सोय करत ते वारीच्या  पुढे निघतात. वारकऱ्यांबरोबर ट्रक जायला रस्ता मोकळा नसतोच.   

वारकऱ्यांच्या साधेपणाने चालण्याच्या सोयीसाठी प्रचंड यंत्रणा राबत असते. पाण्याचे टँकर्स असतात खूप संख्येने. गॅस सिलेंडर बदलून मिळत असतात. मसाज करणारे, आरोग्य तपासण्या करणारे, औषधे देणारे असे बरेच जण वारीबरोबर असतात. पाण्याच्या टँकरच्या नळाखाली उभे राहून एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे वळले की  झाली आंघोळ. चालताना डोक्यावर ओली साडी, परकर घेऊन वळवला जातो, किंवा ट्रक मध्ये वाळत टाकतात. आपण पेपरमध्ये जे वाचतो पोर्टेबल टॉयलेट, निर्मल वारी वगैरे  वगैरे ती व्यवस्था  एकूण वारकऱ्यांच्या संख्येच्या मानाने अपुरी.  त्यात उतरायच्या तंबूपासून ती टॉयलेट्स  एक दोन  किलोमीटर लांब असतात. अंधारात कोणीही स्वतःच्या तंबूपासून इतक्या लांब जात नाही, हरवायची भीती असते. त्यामुळे परंपरेने ज्या मोकळ्या शेतात तंबू टाकलेला असतो त्याच जमिनीला खताने समृद्ध केले जाते. वारकऱ्यांची संख्या आज इतकी प्रचंड आहे  आणि दिवसागणिक वाढते आहे की  एवढ्या  सगळयांना सोयी पुरवणे (वाटेतल्या त्या गावांचा आकार बघता) अशक्य आहे, सध्या तरी. वारकरी खूप कमी सामानात, कमी खर्चात जी पायी वारी करतात, ती प्रत्यक्ष होण्यासाठी मात्र अमाप व्यवस्था आणि पैसा खर्च होत असतो आणि तरीही तो पुरेसा नाहीये. 

गेली १० वर्षं टप्प्याटप्प्याने सुप्रियाला मी तिच्या दिंडीतल्या लोकांच्या जवळ जाताना बघितलंय. सुरुवातीला तंबूत मुक्काम जमणार नाही म्हणून मधल्या गावातले हॉटेल बुक करून, दिंडी मुक्कामी पोहोचल्यावर हॉटेलपर्यंत जायला यायला कार आणि ड्रायव्हर बरोबर घेऊन एका वर्षी २&३ टप्पे करत तिने २०२२ ला पंढरपूरपर्यंत वारी पूर्ण केली. २०२३ साली तिने परत आळंदीहून वारी सुरू केली  आणि ह्या टप्प्यात तिने तंबूत राहायचं ठरवलं. मागच्या वर्षी तिचा पहिला मुक्काम तसा झाला तर पाण्याची बाटली घेऊन शेतात जाणाऱ्या तिला बघून  दिंडीतल्या बायका म्हणाल्या “आता ताई आमच्यातल्या झाल्या”. पण त्यापूर्वीही “ही कोण शिकलेली” असं नव्हतं, खूप सामावून घेतलं तिला सगळ्यांनी. एरवीचं तिचं जग, काम, हे त्या वारकऱ्यांच्या जगाहून इतकं भिन्न आहे की कसं ह्यांचं  जुळतं असा प्रश्न पडावा.  दिंडीच्या  मूळ गावी - बीड जिल्ह्यातील मस्साजोगला पण ती जाऊन आली. वारी नसतानाही ते दिंडीचे प्रमुख महाराज तिला फोन करत असतात अधूनमधून चौकशी करायला. ती वारीसाठी हैदराबादहून पुण्याला घरी आल्या आल्या त्यांचे फोन सुरू होतात, “या की लगेच दिंडीत,  अमुक तमुक चे जेवण आहे, पुरणाचे. या जेवायला” असा आग्रह सुरू असतो. असे वाटू शकते की त्यांचे आपापसात हेवेदावे असतीलही, हिचा  एरवी तसा  त्यांच्याशी संबंध नाही म्हणून सगळेच गोड असेल, पण तसं नाहीये. अकृत्रिम जिव्हाळ्याने ते सगळेच तिच्याशी वागतात.  ते १५ दिवस तरी सगळे एकमेकांचे माउली असतात. एरवी गर्दीत एक भीतीची छाया असतेच मनावर, बायकांना तर ते सहावे इंद्रियच आहे- अशा गोष्टींचा आधीच वास येण्याचे. नवरात्र, गणपती अशा उत्सवातील गर्दीचे अनुभव बरे नक्कीच नसतात. तसे अजून तरी  वारीतल्या गर्दीविषयी ऐकिवात नाही. गर्दी, घाण,अस्वच्छता ह्या गोष्टींपाशीच वारीच्या नकोशा परिणामांचा सूर थांबतो. 

दर वर्षी  सुप्रियाबरोबर वारी अशी आणखी थोडी जवळ येत जाते, काही नवीन गोष्टी देऊन जाते. विचाराला खाद्य पुरवते. त्र्यंबकेश्वर जवळ  ब्रह्मगिरीच्या डोंगरावर निवृत्तीला नाथ धर्माची दीक्षा मिळाली आणि ते निवृत्तीनाथ झाले, त्यांचे शिष्य ज्ञानेश्वर. परंपरेने नाथ संप्रदाय शैव.  एवढी शंकराची जागृत ठिकाणं महाराष्ट्रात  असताना वारी पंढरपूरच्या विट्ठलाचीच का? दक्षिणेत टोकाचा वैरभाव बाळगणारे शैव आणि वैष्णव पंथ महाराष्ट्रात भागवतधर्माच्या पताकेखाली एक झाले. ते कसे, कधी आणि का? अशा प्रश्नांचा शोध घेणे, त्यासंबंधी वाचत राहणे हा आता एक चाळाच लागला आहे. खूप छोटे, मोठे संदर्भ कळतात, दुसरीच काही मजेशीर माहिती मिळते, मजा येते. “विठ्ठल एक महासमन्वय” ह्या पुस्तकात रा. चिं. ढेरे लिहितात,  विठ्ठल हा मूळ गवळ्यांचा, गुरे राखणाऱ्यांचा  देव.  गोपवंशातून येऊन नंतर मातब्बर झालेल्या यादव वगैरे राजवटींमध्ये ह्या देवतेचे उन्नतीकरण होत विष्णूरुपात तो पूजला जाऊ लागला. हा काळ ज्ञानेश्वरांच्या आधीचा. धनगरांच्या विठ्ठल, बीरदेव ह्या दैवत जोडीचा, विठ्ठल आणि वेंकटेश ह्यांच्याशी संबंध, विठ्ठल हा बुध्दच असं बौध्दांचं मत अशी बरीच मतमतांतरे आहेत ह्या बाबतीत. मूर्तीत एकवटलेलं शैव आणि वैष्णव रूप, देवतेला कसं प्राप्त होत गेलं, पांडुरंग शब्दाची भिन्न प्रकारे होणारी व्युत्पत्ती, ह्या आणि अशा प्रश्नांनी एखाद्या देवतेचा प्रवास संस्कृतीत कसा होतो, ते दैवत लोकांच्या मनात कसं रुजतं  ह्याविषयी कुतुहल आणखीच वाढतं. जाणत्यांनी लिहिलेल्या ग्रंथांना वाट पुसत गेल्यावर ह्या तांत्रिक प्रश्नांची उत्तरे मिळतीलही आज ना उद्या.  पण मनाला छळणारा खरा प्रश्न आहे, असं काय आहे वारीत जे  वारकऱ्यांना एरवीच्या पूर्ण वेगळ्या आयुष्यातून दरवर्षी ओढून आणतं? असं काय आहे की जे  सुप्रिया आणि इतर वारकरी ह्यात सामाईक आहे?

मला वाटतं मुक्कामाला महत्व नसलेला, असा  प्रवास आहे वारी म्हणजे.  सगळ्यांबरोबर केलेला, निःसंग होण्याचा प्रयत्न करत केलेला. असा प्रवास की वाटेत कुठेच काहीही बघायचं नाहीये, ज्या पादुकांच्या साक्षीने वारी करायची त्याच्या दर्शनाचाही आग्रह नाही, ज्यासाठी चालतोय त्या विठ्ठलालाही बघण्याची आस नाही,  फक्त लयीतली गम्मत अनुभवत सगळ्यांबरोबर चालायचे आहे. मुक्कामापेक्षा प्रवासच  महत्वाचा आहे आणि म्हणूनच  तो प्रवास दरवर्षी मुळात वेगळा आहे. 

स्वतःतलं विशेषत्व सोडून असंख्यांबरोबर त्यांच्यातलं एक होऊन, एकच एक गोष्ट निर्वेध करण्याचं समाधान वारीत मिळत असेल का?  हा गाडा, व्यवस्था असणार आहे, आपण फक्त तिथं असायचं आहे आणि माऊलींच्या साक्षीने आजुबाजूच्या माऊलींबरोबर चालायचं आहे, बाकी कशाचीही जबाबदारी, चिंता आपली नाही, आपण काहीही ठरवायचं नाहीये आणि त्या तेवढ्या दिवसांत दुसरं काही करायचं पण नाहीये.. 

एरवी आपण सतत हाताने काही करत असतो, मनात दुसऱ्याच कशावर तरी विचार करत असतो‌. त्याशिवायही सतत  पुढे काय हा विचार कळत नकळत चालूच  असतो. कुठे बाहेर फिरायला गेलो, नाटका/ सिनेमाला गेलो तरी तिथे पण वाजले किती, परत कसं जाणार? घरी जाऊन काय करायचं? ह्याचं भान सुटत नाहीच.‌ सतत पुढच्या क्षणाचा विचार करून त्या क्षणातला आनंद आपण हरवून बसतो. कधी  तरी  एका वेळेस एकच गोष्ट, बाकीच्या कशाचाही विचार न करता,  करून बघण्याचा आनंद आपण घेऊ शकतो का? लहान मुलांना मिळतो तो… 

तो मिळत असावा का वारीत? सुप्रिया कार आणि ड्रायव्हर घेऊन जायची तेव्हा कुठेतरी त्यांना आता कुठे बोलवायचं, परत जाताना गर्दीत रस्ता मिळेल का? असे प्रश्न असतीलच, पण एकदा संपूर्ण वारीबरोबर गेलं की आपण एक नगण्य व्यक्ती उरतो, प्रवाहातली. ते क्षण पूर्णपणे जगणं, हा खूप मोठा अनुभव असणार, ज्यापुढे बाकी सगळं गौण ठरतं. वारी ही  संधी देत असेल का? त्या आनंदाच्या ओढीपायी दरवर्षी जात असतील वारकरी. दरवर्षी त्याच ठराविक दिवसांत करायची वारी ही  त्या आनंदनिश्चितीची खूण असत असेल. 

आपण मिळवू शकतो हा आनंद प्रत्यक्ष वारीत न जाता? नियमाने ( रोज/ आठवड्याने/ महिन्याने/ वर्षाने) एखादी छोटी सुध्दा गोष्ट फक्त स्वतःसाठी आणि विना व्यत्यय, निर्वेध करण्याचा निश्चय करून तो पाळून बघितला तर कळेल कदाचित वारीतलं सुख. आपली वारी आपणच ठरवली पाहिजे. 


 


Comments

  1. प्रत्येक शब्दातली आत्मियता..संशोधन..विचार मंथन..या पुढे नतमस्तक 🙏🙏..ही सुद्धा एक शब्द वारी च झाली..विठ्ठलाच्या चरणी नकळत एक प्रकारे सेवाच रुजू झाली 🙏🙏🙏
    रामकृष्ण हरी माऊलीन🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. प्रत्येक विषयांत खोलात शिरून अभ्यास करण्याची तुझी वृत्ती इथेही दिसून येते.... तुझी वारीची व्याख्या आवडली... माझंही तेच मत आहे....!!

    ReplyDelete
  3. देवळाच्या कळसाची खूण माहीत नव्हती. बरीच नवीन माहिती कळली. अभ्यासपूर्ण लेख. तरीही रसाळ भाषा. खरंच वारीतली शिस्त वाखाणण्याजोगी असते. मुक्कामापेक्षा प्रवास महत्वाचा हे पटलं. आपली वारी आपणच ठरवली पाहिजे. किती खरं आहे हे.

    ReplyDelete
  4. खूप सुंदर, अभ्यासपूर्ण लेख. वारीच्या हळूहळू जवळ जाऊन ती समजून घ्यायचा, मग ते दरवर्षीचे रूटीन बनायचा हा प्रवास सुद्धा अतिशय रंजक आहे. प्रत्येकाची आपापली वारी आपली आपणच ठरवायची हा एक खूप छान, वेगळा विचार.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सर्वार्थाने “निरुपमा”