Friday, 26 June 2026

सर्वार्थाने “निरुपमा”

 


एक स्वप्नरंजन असतंच नं, आपल्या ओळखीचं  कोणी तरी एकदम सेलिब्रिटी असावं, त्यांच्याविषयीची एखादी बातमी  इतरांकडून कळावी, आणि मग आपण अभिमानाने सांगावं की त्यांना तर मी ओळखतेच.  माझ्या बाबतीत ते पहिल्यांदा खरे ठरले,  भावे मॅडममुळे. कोण बुवा ह्या सेलिब्रिटी भावे मॅडम? सायकल चालवणाऱ्या पुणेकर भावे आज्जी आहेत नं प्रसिद्ध ? त्याच ह्या.  परवाच त्यांच्या एका मुलाखतीवर कोणीतरी प्रतिक्रिया दिली की  एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व आहे हे. खरेच आहे ते,  मला त्या भेटल्या तेव्हाही  त्या असणार  दिलखुलासच ( हे आत्ता कळतंय) पण कडक, रोखठोक, शिस्तप्रिय ह्या आवरणाखाली तेव्हा  तो “दिलखुलासपणा” झाकलेला होता. 

१९९१ साली मी पुणे विद्यापीठात MSc करायला गेले तेव्हा डॉ. निरुपमा भावे हे नाव पहिल्यांदा ऐकलं. पहिल्या सेमिस्टरला त्या शिकवायला नव्हत्या. पण आम्हाला शिकवायला असलेले वाफारे सर त्यांच्याच  केबिनमध्ये बसायचे, म्हणून दिसायच्या. कॉटनच्या स्टार्च केलेल्या साड्या, एक मोठी सरळ वेणी, गळ्यात एक बारीक मंगळसूत्र आणि कानात छोटंसं काहीतरी, कायम अशाच असायच्या. ह्यापेक्षा वेगळं कधी काही दिसलं नाही आणि हे मात्र नीटनेटकेपणे असायचंच. हात पाठीमागे घेऊन चालणं, अघळपघळ न बोलता  रोखठोक मोठ्याने बोलणं, ह्यातून एक ठाम, नो नॉन्सेन्स  अशी  प्रतिमा तयार झाली होती. पुढच्या सेमिस्टरला त्या शिकवायला आल्या आणि नेमकं, मुद्देसूद, स्पष्ट, पटेपर्यंत शिकवणं म्हणजे काय ते कळायला लागलं.  सरधोपट मार्गाने कुठलीही गोष्ट ( व्याख्या, सिद्धता, counter examples वगैरे ) न सांगता ती गोष्ट का? नसली तर काय ? मग तशीच का? त्यामुळे काय? असे प्रश्न उपस्थित करत मग उलट्या क्रमाने ते तर्कसुसंगत मांडायचं ही त्यांची शिकवायची पध्दत. हातात खडू, डस्टरशिवाय “नोट्स” नामक काही नाही. (मॅडम आणि त्याच sem ला  शिकवायला आलेले TTR  सर ह्यांच्या शिकवण्याच्या  शैलीत काही बाबतीत साम्य जाणवायचं. त्यांचं School एकच कसं आणि मुळात कोणामुळे ते पुढे काही वर्षांनी कळलं.) पहिल्याच टेस्ट मध्ये त्यांनी बऱ्यापैकी सगळ्यांची लायकी दाखवून सगळयांना ताळ्यावर आणले. एकूणच विषय सोडून अघळपघळ गप्पा, मुलांना चुचकारत, त्यांच्या कलाकलाने वागणे  वगैरेंपासून मॅडम कोसो दूर होत्या. वर्गातल्या एका मुलीने त्यांना कायम कशा  starch च्या साड्या नेसता असं विचारलं तर तिच्या धाडसाचं आम्हालाच आश्चर्य वाटलं होतं. 

पुढच्या वर्षी मी discrete special घेतलं आणि त्यांनी जवळजवळ प्रत्येक सेमिस्टरला दोन कोर्स शिकवले. Discrete special च्या आमच्या वर्गात आम्ही मुले पण १५-२० च होतो. वर्गात उत्तरे देणे, शंका विचारणे, चांगल्या लिहिलेल्या assignments आणि पेपर ह्यामुळे हळूहळू आमची आणि त्यांची थोडी ओळख वाढली.  एकदा त्यांनी मला चक्क “आज काय विशेष, कानात नवीन घातलं आहेस” असं विचारलं तेव्हा मला धक्काच बसला होता. (पुढे त्यांच्याशी मैत्री झाल्यावर कळलं की शिक्षक लोक पण विद्यार्थ्यांवर बारीक लक्ष ठेवून असतात, आपसांत कंमेंट्स करत असतात)  MSc संपताना  खास त्यांच्यासाठी अर्चिस मधून ग्रिटिंग आणून त्यांना दिलं इथपर्यंत मजल आम्ही मारली.  

ह्या दोन वर्षांतले काही प्रसंग विशेष लक्षात राहिलेले. काहींमुळे मी/ आम्ही समृद्ध झालो तर काही त्यांच्या एरवीच्या कडक प्रतिमेला छेद देणारे. 

मी दुसऱ्या वर्षाला असताना पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याने CR  व्हायचं, असला काहीतरी निवडणुका टाळणारा फतवा विद्यापीठाने काढला आणि ते प्रकरण माझ्या अंगाशी आलं. मला अजिबात CR व्हायचं नव्हतं. मी उगीचच मला कसं दर सुट्टीत संगमनेरला जायचं असतं, मला नाही जमणार वगैरे कारणं पुढे केली तर त्या सरळ म्हणाल्या, "इच्छा असेल तर मार्ग सापडतो. तो सापडत नसेल तर इच्छा नाही असा अर्थ होतो." लॉजिक मधलं Contrapositive स्टेटमेंट त्यांनी सरळ मला ऐकवलं.  मग मी सरळ “हो, मला इच्छाच नाहीये” असं सांगून टाकलं. खूप पुढे REBT च्या कोर्समध्ये, नकार देताना उगीच सांगितलेली कारणं कशी अंगाशी येतात, हे शिकताना हेच आठवलं. 

Discrete special च्या त्या आमच्या छोट्या वर्गासाठी त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे internal assessments घेतल्या. Lattice Theory  तले शेवटचे काही topics त्यांनी आम्हाला वाटून देऊन वर्गात शिकवायला लावले. पुस्तकात न दिलेले details स्वतः भरून ते शिकवणे अपेक्षित होतं.  मग आम्ही शिकवताना राहिलेलं काही त्या स्पष्ट करून दाखवायच्या. आमच्या नकळत आमची शिकवण्याची पण तयारी होत गेली. मग आमची 5 मार्कांची ओरल ठेवली. कोणाच्या तरी “ ५ मार्कांना syllabus काय? ह्या प्रश्नाला  " सगळा. उद्या lattice थिअरी शिकला आहात पण एवढंही येत नाही, असं होऊ नये हे बघण्यापुरतीच ती ओरल आहे, कळलं असेल तर वेगळा अभ्यास करायची गरज नाही” हे उत्तर. 

आम्ही दुसऱ्या वर्षाला असताना आमच्या वर्गातली स्नेहा प्रेग्नन्ट होती. एकदा लेक्चरला ती उशिरा आली. त्या छोट्या वर्गात रिकामी खुर्ची नव्हती, ती दाराशी दिसताच, हातातले खडू टाकून मॅडम ताडताड दुसऱ्या वर्गातून खुर्ची घेऊन आल्या - तिच्यासाठी. दुसऱ्या क्षणाला शिकवायला सुरुवात. आम्हाला काय चालले आहे ते कळायच्या आत. आमच्यापैकी कोणाला तरी उठवायचे, एवढं कसं लक्षात येत नाही म्हणून ओरडायचे, हल्लीची मुलं वगैरे टिपिकल लेक्चर द्यायचे असं जे बहुतेक इतरांनी केले असते किंवा असतेच तसं काहीच घडलं नाही. हाच तो मनाचा उमदेपणा असावा. ५ मार्कांच्या ओरलसाठी सगळा सिलॅबस ठेवायचा कडकपणा  फक्त Academic बाबतीत होता. एकूणच काही कृती करायची असेल तर मॅडम अति विचार, फार घोळ न घालता करून मोकळ्या होतात, हे पुढे त्यांच्याशी जास्त परिचय होत गेला तेव्हा कळलेच. 

अशीच कृती त्यांनी आमच्या  शेवटच्या परीक्षेच्या वेळेस स्नेहासाठीच केली. तिचे दिवस अगदी भरत आलेले होते, परीक्षा द्यावी की  नाही ह्या काळजीत ती होती तर मॅडमनी HOD शी बोलून स्वतः.च्या केबिनमध्ये तिची पेपर लिहिण्याची व्यवस्था केली, जरा आरामशीर खुर्ची वगैरे. पूर्ण पेपर होईपर्यंत त्या तिथे थांबायच्या.  पुढे त्या HOD असताना मुलींनी डिपार्टमेंटला भोंडला खेळला हे ऐकल्यावर मला  नवल नाही वाटलं. मी PhD चं काम सुरु केलं तेव्हा मलाही म्हणाल्या होत्या, “घर, संसार ह्यापेक्षा ३ -४ वर्षाचा मुलगा असणं ह्याने वेळ लागू शकतो, ह्या वयातली मुलं सारखी आजारी पडतात, त्यात जातोच आपला वेळ. हे सगळं बघता ३-४ वर्षात होईल तुझे काम पूर्ण.” मुलींना, त्यांच्या अडचणींना  सहज समजून घेण्यामागे त्यांचा स्वतःचा प्रवासही कारणीभूत होताच. विद्यापीठात दिसणाऱ्या प्रा. डॉ. निरुपमा भावे हा बऱ्याच धडपडीनंतर त्यांना गवसलेला मुक्काम होता. 

MSc Maths झाल्यावर वाडिया कॉलेजमध्ये स्टॅटिस्टिक्स शिकवायला मॅडमनी सुरुवात केली. BSc पर्यंत त्यांचं स्टॅटिस्टिक्स होतंच, तरीही त्यांना असं वाटलं कि ते पुरेसं नाही. मग परत MSc Stats, MPhil Stats केलं. त्यानंतर परत PhD Maths असा त्यांचा प्रवास. नोकरी, मुलगा सांभाळून हे सगळं. हे केले तर इन्क्रिमेंट आहे का? हे प्रमोशनसाठी धरले जाणार आहे का? असले हिशोब करायची वृत्तीच नाही, जे करायचं ते मनापासून. ज्या क्षेत्रात  हाच  प्रमोशनचा निकष असतो, प्राध्यापकांना काय काम असतं? असं कोणीही टोकावं असेच शिक्षक / प्राध्यापक  आसपास असतात, तिथे इतर कामचुकार माणसांमुळे हताश न होता ही वृत्ती जोपासणं, हे दुर्मिळ आहे, सामान्य नाही. एक उदाहरण सांगते. वर्षानुवर्षे इंजिनीरिंगला गणित शिकवणाऱ्या शिक्षकांना जेव्हा पहिल्यांदा “Inferential Statistics” शिकवायची वेळ आली तेव्हा आपण ते आधी शिकू हा प्रस्ताव बहुमताने कसा  फेटाळला गेला हे मी  बघितलंय. 

विद्यापीठात शिकवतानाही त्या जेवढ्या उत्साहाने शिकवायच्या तेवढ्या स्वतःचा एक “cult “ निर्माण करण्याच्या बाबतीत उदासीन असायच्या. होतकरू मुलं हेरून, त्यांना स्वतःच्या विषयातल्या रिसर्चकडे ओढायचे, कॉन्फरन्स वगैरे ठिकाणी घेऊन जायचे, वर्गात स्वतःचा रिसर्च, पेपर्स वगैरेंविषयी मुद्दाम बोलत राहायचे … ह्या सगळ्यात मॅडम नसायच्या. माझं MSc होत असताना मला दोन जणांनी पुढे रिसर्च करायला आवडेल का असं विचारलं पण होतं, पण मला  ज्यांच्याकडे करायला आवडलं असतं त्या मॅडमनी असं काही विचारलं नव्हतं. MSc नंतर आमचा संपर्क म्हणजे कधी मी विद्यापीठात गेले  तर भेटायचे एवढाच. अशाच एखाद्या भेटीत मी लग्न करून सोलापूरला असते, हे सांगितलं असणार, तिथला पत्ता दिला  असणार. १९९७ साली “Semigraph” वरच्या एका वर्कशॉपची  माहिती त्यांनी मला कळवली आणि मी त्यासाठी पुण्याला आले. मी पुण्यात राहत नव्हते, सोलापूरला तेव्हा कोणत्याही कॉलेजमध्ये नोकरी करत नव्हते, मला  त्यांच्याकडे PhD करायचे आहे असं मी कधी त्यांना सांगितले नव्हते, ह्यातून पुढे काही फायदा होईल असे कोणतेही हिशोब न करता सहज त्यांनी मला बोलावलं होतं. त्यांनतर ३ वर्षांनी मी पुण्याला स्थायिक झाले आणि त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांच्याकडे PhD करायची इच्छा बोलून दाखवली. तेव्हाही  त्यांनी आधी वर्षभर “semigraph” चा अभ्यास कर, मग तुला ह्यात काही करावेसे वाटलं तर बघू, असंच सांगितलं. त्यातही “हा विषय नवीन आहे, ह्यात पेपर पब्लिश होतील ह्याची खात्री नाही, माझे स्वतःचे खूप पेपर्स पब्लिश झाले आहेत, रिसर्च फिल्ड मध्ये फार कॉन्टॅक्टस आहेत असं नाही” हे ऐकवून, “बघ, तरी माझ्याकडे करायचंय का?” असं विचारलं होतं. असंही कोणी सांगू शकतं हा धक्काच होता माझ्यासाठी.  निःसंशय हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. उमदेपणाच्या  ह्या  अस्तरामुळेच वागण्याबोलण्यातला रोखठोकपणा हा कधी कर्कश्श नाही झाला. आता संशोधन क्षेत्रात, तुम्ही स्वतःच्या क्षेत्रातल्या, आणि इतर संबंधित क्षेत्रातल्या लोकांशी जाणीवपूर्वक संबंध वाढवणं,  तुमचा स्वतःचा “Cult / Group’ असणं ही  गरजेची गोष्ट झाली आहे. मॅडमने ते कधी  केले नाही, पण ह्याच अर्थ ते करणं चुकीचंच  आहे असं त्यांचंही मत नसणार. तो त्यांचा पिंड नव्हता एवढंच. आणि म्हणूनच त्या इतके PhD चे विद्यार्थी, तितके रिसर्च पेपर्स अशा सगळ्या आकड्यांपासून त्या छान अलिप्त असायच्या, तसे काही आरोप झालेच कधी तर सोडून द्यायच्या. इतरांच्या ह्या यशाविषयी कडवटपणा नसायचा. त्यांच्या ह्या स्वभावातले बारकावे हळूहळू कळत गेले  तरी त्याची चुणूक तर मी सुरुवातीलाच अनुभवली होती. 

सेमीग्राफ हाच विषय घेऊन मी काम सुरु केलं ते मॅडमच्या त्या विषयाच्याच रिसर्च प्रोजेक्टवर JRF म्हणून. त्यांच्याकडे नुकतीच  PhD केलेल्या देशपांडे मॅडम त्या प्रोजेक्टवर RA म्हणून काम करत होत्या. त्यांच्याशी ओळख झाली आणि आजही आमचं हे त्रिकुट विद्यापीठ, COEP , TTR सरांचे (T.T. Raghunathan) घर असे अड्डे बदलत अबाधित आहे. गेल्या २५ वर्षात आम्हां सगळ्यांच्याच आयुष्यात बरेच  बदल घडले, प्राधान्यक्रमही बदलले, तरी शैक्षणिक कामात हिशोब नाहीत, आपापसात आणि इतरांशीही स्पर्धा नाही, काहीही मिळवायचा अट्टाहास नाही,  हा समान धागा आजही आहेच.

 २००२-२००७ हा ५ वर्षांचा विद्यापीठातील काळ माझ्यासाठी खूप आनंदाचा, निश्चिन्त असण्याचा, समाधानाचा होता, आणि अर्थातच त्यात मॅडमचा वाटा मोठा होता. सुरुवातीला तर मला अभ्यासापेक्षा रोज विद्यापीठात जाणे हेच अवघड वाटत होते. कोथरूडहून बस किंवा सिक्स सीटर हे पर्याय होते, पण विद्यापीठाच्या गेटपर्यंतच, आणि माझं डिपार्टमेंट तिथून लांब. शिवाय मुलाच्या वेळेनुसार जाऊन परत यायचं असेल तर स्वतःच्या वाहनाशिवाय पर्याय नव्हता. संगमनेरला  आणि सोलापूरला लुना चालवली होती, लायसन्स होतं पण पुण्यात स्कुटर चालवायची सवय नव्हती आणि घरात स्कुटरही एकच होती. शेवटी ऑफिस जवळ म्हणून नवरा  सायकलवर आणि मी स्कुटरवर अशी विभागणी झाली आणि मी पुण्यात  स्कुटर चालवायची मनाची तयारी केली. जवळचा रस्ता सोडून लांबचा रहदारी कमी असलेला रस्ता निवडला, त्यात सनकोट,  रेनकोट, नंतर हेल्मेट  हा वैतागवाणा  जामानिमा. जन्माने पुणेकर असल्याने गाडी चालवण्यापेक्षा दामटवण्यात माहीर असलेल्या, हेल्मेट सोडाच, कधी रुमालही न बांधणाऱ्या मॅडमना  माझ्या ह्या त्रेधातिरपिटीचं हसू येत असणार, पण त्यांनी जाणवून दिलं नाही कधी तसं. त्यातच नानाविध कारणांसाठी मला कधी जाताच यायचं नाही, कधी लवकर निघून यावं लागायचं, त्यात स्वभाव मानी +संकोची, त्यामुळे ह्या सगळयाचा अपराधी भाव, मनस्ताप होताच. ह्या सगळ्यातून माझा निभाव लागला तो मॅडमनी दाखवलेल्या विश्वासामुळेच. अभ्यास होणं महत्वाचं, टेक्निकली तो विद्यापीठात बसून करायचा असला तरी तो होणं महत्वाचं असं त्यांचं मत. “तुझ्यासारखी मुलगी घरी बसली तरी अभ्यासच करेल ह्याची खात्री आहे मला” असं म्हणून त्यांनी मला आश्वस्त केलं. अर्थात मीसुद्धा पूर्ण ६ तास फारशी कधी थांबले नाही  तरी माझं जाणं खूप नियमित असेल ह्याची काळजी घेतली.  नियम कशासाठी ते न बघता फक्त नियमांवर बोट ठेवणारा दुसरा एखादा गाईड असता तर माझा PhD अध्याय संपला असता थोड्याच दिवसात. 

गणितासारख्या विषयात PhD चा अभ्यास म्हणजे प्रश्न आपणच निर्माण करायचे आणि त्याची उत्तरे आधी शोधायची आणि मग सिद्ध करायची हा प्रकार. सुरुवातीचा काळ तर एखाद्या दिशेने बराच काळ प्रयत्न केल्यावर ही  ती दिशाच नाही हे लक्षात येणार. गाईड हा काही शिक्षक नसतो - ज्याला  आधीच सगळे माहित असते. त्यामुळे करून बघणे ह्याला पर्याय नाही. गाईडला विद्यार्थ्यांच्या थोडं  आधी चालू प्रयत्न फसणार आहे कि यशस्वी होणार ह्याचा अंदाज येतो हे मात्र खरे. अशा फसलेल्या प्रयत्नात वेळ वाया जात नाही तर तो आपली विषयाची समज वाढवतो हे सतत सांगणे हे खरे गाईडचे काम. अशा फसलेल्या प्रयत्नांचे पण documentation करणे हे पण खूप कंटाळवाणे वाटले तरी महत्वाचे असते. आमच्या प्रोजेक्टला DST चे अनुदान असल्याने त्यांना जे दार सहा महिन्यांनी अहवाल पाठवावे लागायचे  त्यातही काय काम झाले त्याबरोबरच काय झाले नाही आणि का हे पण लिहायचे हा मॅडमचा आग्रह असायचा. आशा निराशेच्या त्या हिंदोळ्यात निराश न होता आणि हुरळूनही न जाता काम करण्यातली मजा अनुभवता यायला लागली कारण मुळात घायकुतीला न येणं, अति विचारापेक्षा कृतीला महत्व देणे, सकारात्मक असणं - आजच्या भाषेत chill असणं हा मॅडमचा स्वभाव कारणीभूत होता. त्यात त्याच काळात त्यांच्या आयुष्यात नव्याने आलेल्या त्या “सायकलने” तर त्यांचा उत्साह, ऊर्जा कितीतरी पटींनी वाढली होती. 

ज्या दिवशी लेक्चर नसेल त्यादिवशी साडी बाजूला ठेवून, ड्रेस घालून  विद्यापीठात सायकलवर यायचं इथून सुरुवात झाली. सायकलच्या वेगाचा अंदाज नीट नव्हता, त्याकाळात एकदा चतुःशृंगीवरून विद्यापीठाकडे यायच्या रस्त्यावर डावीकडे वळताना मागच्या गाडीला धडकून त्या पडल्या. विद्यापीठ जवळच असल्याने तिथल्या हेल्थ सेंटर मध्ये गेल्या. डिपार्टमेंटला त्या पडल्याची बातमी आली आणि प्रत्येकाच्या मनात येऊन गेलं “ काय अडलंय ?” काहींनी बोलूनही दाखवलं, पण अश्या गोष्टींनी थांबण्याइतकं सायकलचं ते वेड वरवरचं नव्हतंच. मग दर रविवारची सायकल फेरी, सिंहगडला जाणं, एका दिवसात भोर पर्यंत जाऊन परत येणं हे टप्पे होत असताना हे आवड म्हणून, मजा म्हणून, शारीरिक तंदुरुस्तीसाठी असं सगळ्यांना - कदाचित  त्यांना सुद्धा वाटत होतं. पण मग विषय निघाला पहिल्या  सायकल मोहिमेचा - आग्रा ते वाघा बॉर्डर - सायकलवरून. डिसेम्बरमध्ये सुट्टी असल्याने तो प्रश्न नव्हता, पण त्यावर्षी डिसेम्बरमध्ये लखनौला असणाऱ्या IMS च्या वार्षिक कॉन्फरन्सला जायचं ठरत होतं, माझा पहिला पेपर मी वाचणार होते. तर त्यांनी चक्क मला विचारलं, “तुझ्या पहिल्या पेपर प्रेझेंटेशनला मी असायला हवं खरं तर, पण नसले तर चालणार का?” मी अर्थातच हो म्हटलं आणि त्यांची सायकल मोहिमेची तयारी सुरु झाली. रोज १०० किमी सायकल चालवता येण्यासाठी स्टॅमिना वाढवण्याची प्रॅक्टिस सुरु झाली. डिपार्टमेंटची कामं सांभाळून रोज सायकलचा सराव, स्टॅमिना वाढण्यासाठीचे व्यायाम हे सगळं  त्या जिद्दीने करत होत्या. लखनौला सगळ्यांना जेव्हा त्यांच्या अनुपस्थितीचं हे कारण कळलं तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्या मोहिमेच्या यशाने मॅडमच्या ह्या नव्या ओळखीवर शिक्कामोर्तब झालं. आणि मग दरवर्षी अशा मोहिमांची रीघ लागली. मध्यप्रदेश, राजस्थान, खारदुंगला पास, पुरी ते कोलकाता , पुणे ते कन्याकुमारी, लष्कराच्या साहाय्याने काश्मीर, नामदेव गेले त्या मार्गाने पंढरपूर ते घुमान, आग्र्याहून सुटका झाल्यावर शिवाजीमहाराज ज्या मार्गाने राजगडावर आले त्या मार्गाने आग्रा ते राजगड आणि कितीतरी. ह्या मोहिमांमुळे मिळालेला आत्मविश्वास त्यांना गोमुख ते गंगासागर पायी ( त्यात सुरुवातीचा काळ प्लास्टरमधला पाय घेऊन), निम्म्या वयाच्या मुलांबरोबर “Enduro”, तैलबेला रॉक क्लायंबिंग ह्या अनवट मोहिमांवर पण घेऊन गेला. 

ह्या सगळ्या मोहिमांची तयारी, त्यात  घडलेले गमतीशीर किस्से ह्या सगळ्याला आम्ही जवळून साक्षीदार. सायकलची इतकी सवय झाली कि कुठंही जाताना पहिला पर्याय सायकलचाच त्यांच्या ड़ोक्यात यायचा, अजूनही येतोच. एका मीटिंगसाठी त्यांना चेन्नईला IIT त जायचं होतं. एका दिवसात विमानाने परत. त्यामुळे सामान काही नव्हतं. मग मॅडम पहाटे प्रभातरोडवरून लोहगावला विमानतळावर सायकलने गेल्या. सायकल विमानतळावर ठेवली, पुण्यात परत आल्यावर रात्री लोहगावहून सायकलवर घरी परत. उलटही व्हायचं, सायकल मोहिमेच्या रूटवर जर एखादं विद्यापीठ असेल आणि त्या दिवशी तेवढा वेळ असेल तर तिथे गणित विभागात धडकून त्या एखादं गेस्ट लेक्चर पण देऊन  यायच्या. रिटायर्ड झाल्यावर COEP मध्ये Adjunct Professor म्हणून काम करताना तर त्या हमखास सायकलवरच यायच्या. आता सायकल ही फक्त हौस, व्यायाम, स्वतः च्या शारीरिक, मानसिक क्षमतांना आव्हान अशी न राहता त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग झाली आहे. सातत्याने सायकल चालवण्याने त्यांच्या शारीरिक क्षमतांमध्ये काय फरक पडत गेला हे एका प्रसंगावरून लख्ख  लक्षात आलं. वयाच्या सत्तरीत आलेल्या एका आजारपणातून बाहेर पडून एका महिन्यात त्या सायकल चालवायला लागल्या, जिथे सर्वसामान्य माणसाला नुसतं बरं  व्हायलाच सहा महिने लागले असते. 

मॅडमशी कितीही मैत्री असली तरी त्यांच्या जवळच्या सायकलपासून मी चार हात लांबच राहिले. पण त्यांच्या आयुष्यातल्या जवळच्या दोन माणसांच्या सहवासाने मात्र खूपच शिकवलं. त्यांच्याशी नातं जोपासणं, टिकवणं, जबाबदाऱ्या निभावणं हे सगळं केलं मॅडमने आणि ह्यातलं काहीही करावं न लागता मला मात्र ती अलगद मिळाली. ती दोन माणसे म्हणजे भावे सर आणि TTR सर. 

मला भावे सर भेटले ते कायम इतिहास संशोधन मंडळाचे सचिव, पुक्टोचे प्रमुख सल्लागार म्हणूनच, वाडिया कॉलेजमधले गणिताचे प्राध्यापक म्हणून नाहीच. त्यांच्या व्यासंगामुळे कोणत्याही विषयावर काहीतरी मूलभूत आणि वेगळाच दृष्टिकोन ऐकायला मिळायचा- अगदी जागतिक राजकारण, लोकशाही कि हुकूमशाही पासून ते मुलांनी  करियरचे रूढ मार्ग निवडावेत कि नाही इथपर्यंत. शिक्षकी पेशातले नियम आणि संस्थात्मक राजकारणं ह्यांना तोंड देताना सरांचा सल्ला निर्धास्त करायचा. प्रभात रोडवरच्या मॅडमच्या घराच्या बाहेरच्या खोलीत दिसायची ती फक्त पुस्तकं - माळ्यावरच्या खास त्यांच्यासाठी केलेल्या कपाटांमध्येच  नाहीत तर कायम वापरात असल्यासारखी टेबलावर, टीपॉयवर, पलंगाशेजारच्या स्टुलांवर सगळीकडे. पुस्तकांच्या पाठोपाठ लक्ष जायचं ते भिंतीवरच्या मोठ्या फळ्याकडे आणि त्यावर लिहिलेल्या असंख्य निरोपांकडे. मोबाईल नसण्याच्या काळात, संपूर्ण वेगवेगळ्या वर्तुळात वावरणारे सर आणि मॅडम एकमेकांसाठी असलेले निरोप त्या फळ्यावर लिहून ठेवायचे. आपापले स्वतंत्र व्याप सांभाळत, आवश्यक तेवढी  एकमेकांच्या व्यापाची दखल कशी घ्यायची ह्याचं उदाहरण म्हणजे तो फळा. सायकलच काय स्कुटरसुद्धा क्वचितच चालवणारे सर मॅडमच्या ७० व्या  वाढदिवसाला त्यांची पुणे कन्याकुमारी मोहीम संपायच्या वेळेस कन्याकुमारीला जाऊन थांबले होते, आणि सर गेल्यावर मॅडमनी त्यांची सगळी पुस्तकं निगुतीने योग्य व्यक्ती, संस्था शोधून त्यांच्या हवाली केली. 

TTR सरांची आणि माझी ओळख काही मॅडममुळे झाली नव्हती, ते MSc ला मलाही शिकवायला होते. हातात नोट्स नामक कागदाचा एकही तुकडा न घेता, सलग ३ तास, तेसुद्धा मुलांना कंटाळा न येऊ देता शिकवणारे सर म्हणून त्यांच्याबद्दल आदराचीच भावना होती, थोडी भीती पण. MSc संपता संपता मॅडमशी थोडं थोडं बोलण्याइतकी प्रगती झाली असली तरी सरांशी कामाशिवाय बोलणं व्हायचं नाही. मी PhD करायला सुरुवात केली तेव्हा ते रिटायर्ड झाले होते. ते मॅडमचेही  शिक्षक आणि  PhD चे गाईड. पण त्याबरोबरच सहकारी, सुहृद, ते एकमेकांसाठी कोणत्याही प्रसंगात उभी राहणारी हक्काची व्यक्ती एवढी त्या संबंधांची व्याप्ती होती. एकटेच राहणाऱ्या  सरांच्या दैनंदिन घडामोडीत आवश्यक तिथे लक्ष घालण्याची जबाबदारीही मॅडमची, विशेषतः सरांच्या  बायपासनंतर - जवळजवळ २० वर्षे. सकाळी सायकलवर चक्कर झाली की  रोज सरांकडे जाऊन कॉफी घ्यायची हा त्यांचा शिरस्ता होता. मॅडम HOD झाल्या आणि  सर डिपार्टमेंटला परत एखादा कोर्स घेण्याच्या निमित्ताने रोज यायला लागले आणि TTR सर, भावे मॅडम, देशपांडे मॅडम आणि मी असा  आमचा अड्डा जमला. गूगल नसण्याच्या काळात ग्राफ थिअरी साठी सर म्हणजे आमचा एन्साय्क्लोपीडियाच. माझ्या कामावर त्यांचं मॅडम इतकंच लक्ष असायचं, माझा पूर्ण थिसीस त्यांनी वाचला होता.  शिवाय ते शिकवण्याची तयारी कशी करतात, पेपर कसे सेट करतात हे पण जवळून शिकता  आलं. रोजच्या सहवासाने नकळत घरगुती जिव्हाळ्याचे बंध निर्माण झाले. मग कधी सरांना गाडीवर  आणणे, पोहोचवणे, बरं नसेल तर डबा देणे ह्यात मॅडम आणि देशपांडे मॅडम बरोबर मीही सामील होत गेले. 

आमचं सगळ्यांचं विद्यापीठात एकत्र असणं थांबलं तरी संबंध संपले नाहीत, उलट वाढले. मग आमचा अड्डा TTR सरांच्या घरी जमायला लागला - पंधरा दिवसातून खास तामिळी कॉफी प्यायला. आम्ही चौघे आणि भावे सर असे पाच जण अधूनमधून जेवायला बाहेर जायचो. Academic Family असं चेष्टेने म्हणायचो आम्ही. ह्यात पुढाकार देशपांडे मॅडमचा असला तरी ह्या पंचकोनाचा गुरुत्वमध्य मॅडमच. गंमत म्हणजे असे जिव्हाळ्याचे संबंध असलेले मॅडमचे बरेच गट आहेत, बहिणी, नातेवाईक, शाळेतल्या मैत्रिणी, त्यांचा MSc चा ग्रुप, आणि सायकल मोहिमातले राठी सरांसारखे कितीतरी. “मित्र म्हणे” ह्या पॉडकास्टवरच्या मुलाखतीत मॅडम म्हणाल्या होत्या, “जगात ९५% माणसे चांगलीच असतात, उरलेली ५%  माझ्या वाट्याला येत नाहीत.” खरेच आहे ते, पण प्रोबॅबिलिटीच्या नियमानुसार नाही, तर त्यांच्या स्वभावामुळे. मॅडम काही अजातशत्रू वगैरे नव्हत्या, डिपार्टमेंटलाही काही जणांशी त्यांचे वाद होते, तशी बाहेरही इतरही काही माणसे असणारच, पण ते सोडून देऊन त्याचा स्वतःला त्रास कसा करून घ्यायचा नाही  ही युक्ती त्यांना सापडली आहे. कदाचित सुरक्षित वातावरणाबाहेर, मोहिमांच्या निमित्ताने स्वतःला मोकळं सोडून देताना; अपरिचित जगाशी, परिस्थितीशी, माणसांशी जुळवून घेताना; येत गेलेल्या चांगल्या अनुभवांनी ती ताकद दिली असेल. 

पहिली पन्नास वर्षे अगदी शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरणात गेल्यावर, सायकल मोहिमा ह्या  वेगळ्याच ध्यासामुळे एकदम प्रसिद्धीचा झोत जितक्या सहज मॅडमच्या अंगावर आला, तितक्याच सहजतेने त्यांनी तो स्वीकारला आहे.  सत्कार, लोकांनी ओळखणं, कौतुक करणं, मुलाखतींसाठी विचारणा, मुलाखती देणं ह्या  सगळ्याची  त्या मनापासून मजा घेतात. ह्या निमित्ताने सगळ्या  पन्नाशीतल्या बायकांना शक्य तितकं प्रेरित करतात, सायकल शिकायची असेल तर मदत करतात, पण किती जणांनी मुलाखत बघितली, त्याचं  पुढे काय झालं ह्याचा  फारसा विचार करत नाहीत. मुळात सोशल मीडियाच्या आभासी जगापासून दूर असल्याने आहे ती प्रसिद्धी  विनाकारण अनंत पटीने वाढवून त्याचं  ओझं त्यांनी होऊ दिलं नाहीये. अर्थात त्यासाठी त्यांना फार काही कष्ट पडलेच नसणार, कारण आजही नवीन मोहिमांचे मनसुबे आखताना, स्वतःच्याच यशात भान हरपून रमून जायला रिकामा वेळ आहेच कुठे त्यांच्याकडे? 


No comments:

Post a Comment

सर्वार्थाने “निरुपमा”

  एक स्वप्नरंजन असतंच नं, आपल्या ओळखीचं  कोणी तरी एकदम सेलिब्रिटी असावं, त्यांच्याविषयीची एखादी बातमी  इतरांकडून कळावी, आणि मग आपण अभिमानाने...