Posts

वारी - सगुणाकडून निर्गुणाकडे - एक प्रवास

  वारी म्हटले की  पहिल्यांदा डोळ्यासमोर येते, ते शाळेच्या पुस्तकातले वर्णन - महाराष्ट्रातील संत आणि वारकरी संप्रदाय ( टीप लिहा - ४ मार्क) आणि पाठोपाठ दरवर्षी पेपरमध्ये येणारा दिवेघाटातला  ज्ञानोबा माउलींच्या पालखीचा आणि वावरकऱ्यांच्या अलोट गर्दीचा फोटो. लहानपणी वारीशी संबंध आला, तो एवढाच. ह्यात मधेच एक छोटीशी भर पडली म्हणजे बाबांच्या ऑफिसमधले एक जण वारकरी होते, ते  दरवर्षी वारीला जायचे  आणि प्रसाद घेऊन यायचे.  एका वर्षी त्यांनी  आमच्यासाठी विठोबाची फ्रेम आणली होती. प्रत्यक्ष वारीत जाणारी  मी बघितलेली ती  पहिली व्यक्ती.  मग खूप नंतर वारकऱ्यांचा  विठ्ठल भेटला, तो इरावती कर्व्यांचा “बॉयफ्रेंड” म्हणून, त्यांनी अनुभवलेली वारी वाचताना.  पुण्यात शिकायला आल्यावर, मी विद्यापीठात म्हणजे आमच्या भाषेत जंगलात राहायची. त्यामुळे कधीतरी स्थानिक मुलामुलींकडून पालख्या येणार, त्यामुळे रस्ते बंद असे ऐकले होते, तेवढेच. त्यांनतर पुण्यात स्थायिक झाले, तरी पेपरमधल्या बातम्या सोडल्यास वारीशी काहीही संबंध नव्हता. पालख्यांचे दर्शन घेणे वगैरे लांबच, त्या...

सर्वार्थाने “निरुपमा”

  एक स्वप्नरंजन असतंच नं, आपल्या ओळखीचं  कोणी तरी एकदम सेलिब्रिटी असावं, त्यांच्याविषयीची एखादी बातमी  इतरांकडून कळावी, आणि मग आपण अभिमानाने सांगावं की त्यांना तर मी ओळखतेच.  माझ्या बाबतीत ते पहिल्यांदा खरे ठरले,  भावे मॅडममुळे. कोण बुवा ह्या सेलिब्रिटी भावे मॅडम? सायकल चालवणाऱ्या पुणेकर भावे आज्जी आहेत नं प्रसिद्ध ? त्याच ह्या.  परवाच त्यांच्या एका मुलाखतीवर कोणीतरी प्रतिक्रिया दिली की  एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व आहे हे. खरेच आहे ते,  मला त्या भेटल्या तेव्हाही  त्या असणार  दिलखुलासच ( हे आत्ता कळतंय) पण कडक, रोखठोक, शिस्तप्रिय ह्या आवरणाखाली तेव्हा  तो “दिलखुलासपणा” झाकलेला होता.  १९९१ साली मी पुणे विद्यापीठात MSc करायला गेले तेव्हा डॉ. निरुपमा भावे हे नाव पहिल्यांदा ऐकलं. पहिल्या सेमिस्टरला त्या शिकवायला नव्हत्या. पण आम्हाला शिकवायला असलेले वाफारे सर त्यांच्याच  केबिनमध्ये बसायचे, म्हणून दिसायच्या. कॉटनच्या स्टार्च केलेल्या साड्या, एक मोठी सरळ वेणी, गळ्यात एक बारीक मंगळसूत्र आणि कानात छोटंसं काहीतरी, कायम अशाच असायच्या. ह...